माल्या आज्याले बहाड्या बैलाचं सपन दिसलं..
आमचा आजीले नांदाच
असे, 'आजी काईतरी कायनी सांग..... कायनी सांग...' तिच्याजोळ काई
गप्पाईचं पोतं नवतं. तिनं एकच कायनी लय खेप सांगेल हाय.. आम्ही बी तेच ते
आयको..
मंग आजीच्या कायनीले सुरूवात व्हायची.., ''आपल्या घरी
पैले होंडक्या शिंगाचा बहाडा बैल होता. गावामंदी चारा नसला की, बैलं
पाहाडात पाठवा लागत. मंग सन्या त्या साली बहाड्याले बी जंगलातच पाठोलं..
उनाया होता... वावरात काही कामंधामंबी नवता.''
आजी कायनी सांगे आमी नुसतं '' हुं हुं '' म्हणून आयकत जायचो..झोप येईस्तोवर असं चालेच.
'' सातपुड्याच्या पाहाडात बैलं घिऊन जाणा-या लोकाईले आपून जवारी द्याचो..
सूर्य डुबेलोक बैलं पाहाडाईत चरत.. त्याईच्या दोनी कुसा तंग फुगल्या
की, गुराखी लोकं ठाण मांडेल जागेवर बैल बांधत...जेवत अन् झोपी जात.. ''
हुं हुं करत आमी गुंगावल्यासारखे बोलत होतो.
'' चारा नसला की, बैलाईचे हाडकं उघडे पडतं.. असे हालं पाऊन आपल्यालेबी
काहाची भाकर धकते मंग.. बहाडा होताबी चांगला सटकर बैल... तुया आबाले
बहाड्याले सोडून गमेना.. पण चारा नवता तं वाटे की, बैलाची माती नाई झाली
पायजे.. पाठोला पाहाडात..''
''असचं एकदा पाहाडात च-याले गेल्यावर
संध्याकाई बहाडा ठाणावर आलाच नाई. गुराख्याईले वाटलं.. बॉ उपाशी अशीन तं
चरतं अशीन बहाडा.. झाकट पडली.. चांगला अंधार झाला.. गुराख्याईचे ठाणावर
जेवणं झाले.. ते झोपीबी गेले.. पण बहाडा काई आला नाई..''
आजी तीच ती गोष्ट सांगे तरीबी आमच्या झोपा घटकाभर उडून जातं.. आमी हूं हूं करत बाहाडा कुटी गेला अशीन याचं टेन्शन घेत होतो.
'' आता अशी गोष्ट कोणाच्या ध्यानी मनी असते काय, काई कोणाचा निरोप नाई
की, काई नाई... पण त्याच राती तुया आज्याले बहाड्याचं सपन पडलं.. अन् आजा
दचकून उठला.. म्या इचारलं काय झालं तं. म्हणे आपला बहाडा मले डोंगरात
पडेल दिसला... एकटाच होता.. त्याच्या आजुबाजुले.. एक बी बैल नवता..अन् तो
कुटी पडेल हाय ते बी त्यानं सांगलं मले.. मी पायटी डोंगरात जातो...
बहाड्याले पायतो..असा तुवा आजा म्हणे''
आमी- ''मंग काय झालं..''
''मलेबी वाटलं बॉ बुढा कधी तं असा दचकून उठला नाई.. आज कसं काय झालं अशीन
देव जाणे.. तिस-या दिवशी आमचं च्या पाणी झालं.. तसा दारात गुराखी आला.
त्यानं घायबरतचं निरूप देला '' तुमचा बहाडा बैल दिसून नाई रायला.''
आबाच्या डोयापुडे त्या दिवशीचं सपन उभं झालं.. अन तसाच आबा पहाडाकडं
निघाला.. पहाडपट्टी, पाणवठे आज्यानं पायथे घातले.. संग गुराखीबी होते..
एका ठिकाणी बहाडा पडलेला दिसला.. तो कायमचा झोपला होता.. त्याची वाघानं
शिकार केली असं दिसत होतं.. पहाडासारखा धिट आबा क्षणातचं विरून गेला..
त्याचा बहाडा दिसेनासा झाला होता.. त्याचा रोजचा दोस्त.. वावरात
त्याच्यासंग राबणारा यारं.. दिलदार.. सवंगडी.. त्याचा अन्नदाता..
जिवाचा जीव त्याला सोडून गेला होता.. कायमचा..
पहाडातून खाली
हातानं परतनं आज्याले मान्यच नवतं.. कारण तो बहाड्याले घरी घिऊन जायच्या
इराद्यात आला होता.. शेवटी आज्यानं बहाड्याच्या शिंगाची गळून पडलेली खोय
सोबत घेतली.. अन् तसाचं तो रडक्या मनानं घरी परतला..
मंग आमच्या वावरात बहाड्या बैलाच्या शिंगांची खोय पुरली... त्याची आठोण म्हणून देवा-यात चांदीचा बहाडा बैल ठेवला...
- महेश भ. घोराळे
Comments
Post a Comment