कुणी घर देता का घर?

कुणी घर देता का घर?
घरासमोर शिल्लक राहिलेल्या बागेत किंवा छतावर चिऊताईला दाणा-पाणी देण्यासाठी आज लाखो हात समोर येतात; पण सिमेंटच्या घरांभोवती यायला ती तयार नाही. जागोजागी एसी, कुलर, काचा आणि पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, बागेची झालेली पार्किंग अशा वातावरणात घरटं कुठे बांधायचं, हा प्रश्न तिच्यासमोर आहे. शहराला दुरावलेली चिऊताई आज अंगाई गीतं किंवा चिऊ-काऊच्या गोष्टीपुरतीच कुठेतरी शिल्लक आहे. नाही तर कैक चिमुकल्यांना आया मोबाईलमधला "अँग्रीबर्ड' खेळवत झोपवतात. हे वास्तव आहे.उन्हाळा सुरू झाला म्हणून घरामागच्या आडोशाला पाखरांसाठी दाणे, पाणी ठेवलं. एरवी कावळा, कबुतरं, टिटवी किंवा भरटकलेला पोपट घरामागच्या बागेत येतो; पण गेल्या पंधरवड्यातल्या निरीक्षणात चिऊताई ना पाण्यासाठी फिरकली ना दाण्यासाठी. वाढते शहरीकरण, घरांच्या आधुनिक रचनेमुळे तिचा माणसांभोवतीचा अधिवास हरवला आहे. कीटक, धान्य व शिजलेले अन्न खाणाऱ्या इवल्याशा चिऊताईचे भवितव्य प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या तिच्या भावविश्वाला उजाळा देण्यासाठी दोन ते तीन दशके भूतकाळात जावे लागेल. कौलारू घरं, जुने लाकडी वाडे, घरातील फोटोंमागे, खिडकीच्या आडोशाला, भिंतींच्या फटीत किंवा विहिरीतील छिद्रात अशा वळचणीच्या व सुरक्षित जागी ती हमखास घरटे बांधते. पूर्वीसारखी दुपारच्या जेवणानंतर ताटात बसून शिल्लक राहिलेला दाळ-भात धीटपणे टिपणारी चिऊताई आजच्या गृहसंकुलांमध्ये दिसणार नाही. माणसांभोवती मोठ्या विश्वासाने राहणाऱ्या चिऊताईचे घरटे आधुनिकीकरणाने उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे कितीही विश्वासाने शहरात त्यांच्यासाठी दाणा-पाणी ठेवले तरी ती परत फिरेलच याची शाश्वती नाही.
अपार्टमेंट संस्कृती आणि अन्नाची वानवा

संवर्धनातील अडथळे
चिमण्यांच्या घटत्या संख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन 20 मार्च 2010 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिमणी दिन पाळला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून देशात विविध पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्था चिमणी वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोक चिमणी संवर्धनासाठी पुढे येत आहेत. शहरात चिमण्यांना घरटे बांधणे शक्य नसल्याने कृत्रिम घरट्यांचे वाटपही पक्षीप्रेमी करतात. शिवाय बाजारातही हे घरटे विकत मिळतात; पण अधिवासाभोवतीचे वातावरण दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने चिवचिव ऐकू येत नाही.कृत्रिम घरट्यांबाबतचा एक प्रसंग येथे नमूद करावा वाटतो. नाशकात एका मित्राच्या घरी जाणं झालं. प्रवेशद्वाराजवळ गॅलरीत अत्यंत सुंदर घरटं अडकवलेलं. घरात येणाऱ्यांचे ते हमखास लक्ष वेधून घेईल एवढी कलात्मकता. "छान' म्हणून बसलो. "चिमणी येत नसेल नाऽऽ रे यात?' परतताना मित्राला एवढंच विचारलं. खालमानेने तो "नाही' म्हणाला. "घर कितीही सुरक्षित, आकर्षक किंवा महागडं असू दे; पण त्यात घरपणच नसेल तर नुसत्या इमारतीत कुणालाही करमत नाही; तसंच घरट्याचं आहे.' हे त्याला कळलं असावं. म्हणून पुढच्या वेळी घरटे आणि त्याची जागा बदलली होती. सुरक्षित व शांत ठिकाणी कृत्रिम घरटी अडकविल्यास तेथे चिमण्या येतात. त्यामुळे कृत्रिम घरट्यांचा गॅलरीतल्या झुंबरासारखा वापर न होता ते वळचणीच्या ठिकाणीच ठेवले गेले पाहिजे.
घरटंही बदलत गेलं
माणसांची घरं बदलत गेली, तशी तडजोड चिमणीनेही केली. पूर्वी वाळलेल्या गवताच्या काड्या-काड्या वेचून घर बनविणारी चिमणी पुढे गवताबरोबर कापूसही वापरू लागली. शहरात घरट्यांसाठी जागा मिळाली तर गवत कुठून आणणार म्हणून कापडाचे तुकडे, सुतळीच्या दशा, सुती धागे आदी बाबीही घरट्यात दिसू लागल्या. अलीकडची निरीक्षणे भयानक आहेत. कचरा डेपोच्या परिसरातील काही घरट्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचे जीर्ण तुकडे, प्लास्टिकचे बारीक दोर आदी बाबीही आढळतात.मोबाईल चिमण्यांसाठी घातक
शहरातल्या घरात मोठ्या मेहनतीने तयार केलेलं घरटं कधी "डस्टबिन'मध्ये जाईल याचा नेम नाही. चिमणी आणि पिलांवर मोबाईलच्या ध्वनिलहरींचा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ध्वनिलहरींमुळे चिमणीची अंडी उबविण्यापूर्वीच खराब होत आहेत. त्यामुळे मोबाईलचा वाढता वापरही चिमण्यांसाठी घातक ठरत आहे. घरटं आणि दाणा-पाण्यासाठी रानोमाळ भिरभिरणारी चिमणी हल्ली कधीतरी पाहुणी म्हणुन घराभोवती येते. तिचा मानवी वस्त्यांमधला मुक्काम वाढावा यासाठी सर्वांच्या व्यापक प्रयत्नांची गरज आहे. तशा वळचणीचा कोपरा घराभोवती जोपासने ही आजची गरज बनली आहे. केवळ पक्षी किंवा पर्यावरणप्रेमींपुरतीच चिमणी मर्यादित राहू नये.- महेश घोराळे
महेश अप्रतिमच लिहिलंस..
ReplyDeleteमी शहरात वाढलो, त्यामुळे तुझ्या चिमणीच्या जागा मी केवळ चित्रपटांमधून अथवा टिव्हीवरच पाहिल्या. मात्र आज तुझा ब्लॉग वाचून पुन्हा त्या दिवसांची आठवण झाली. किती मनाला भिडणारं लिहितोस रे... तेही अगदी मनापासून....
तुझ्या चांगल्या लेखाची नेहमीच मी वाट पाहातो.. आणि तुझा लेखन माझ्या या वाट पाहाण्याला सार्थही ठरवते...
https://vijaysjadhav.blogspot.com
ReplyDeleteमी ना नफा ना तोटा तत्त्वावर चिमणी घरटं तयार करून देतो, https://udyojak.org/sparrow-nest-manufacturer-vijay-jadhav/
ReplyDelete