शेंबडी पाेरं अन् गुलाबी दुध..


नांदुरा (बुलडाणा) येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत हाेताे. चार दिवसांपुर्वी या शाळेत जाता आलं. 23 वर्षानंतर शाळा पाहिली नि पहिला वर्ग आठवला. बाजाराच्या पिशव्या घेऊन शेंबड्या नाकानं शाळेत येणारी मित्र आठवले, टकल्यावर घाम येईस्ताेवर पाेरांना कुट कुट कुटणारे पाटील सर आठवले, ''शेजारच्या कन्या शाळेत जाऊ नये'', असे दिवसातून किमान तीन ते चारवेळा सांगणा-या देशमुखबाई आठवल्या. लेखना खाणा-या, वर्गात चिंचाेके खेळणा-या झिप-या पाेरी आठवल्या.
शाळेला तशी इमारत नव्हती. ठेंगण्या दरवाज्यातून वाकून वर्गात जावे लागे. टीनशेडचे वर्ग. शेजारीच मुतारी. लागूनच भाऊसाहेब अर्थात मुख्याध्यापकांची `गुहा` (हाेय, गुहाच. तेव्हा भाऊसाहेबांचा दराराच तसा असायचा.) जेवणाच्या सुटीत व्हरांड्यात पाेरं डबे उघडत. त्याआधी 12 च्या सुटीत गुलाबी दुध मिळायचं (आताच्या भाषेत - राेझ फ्लेवरचं दुध), त्यासाठी पाेरं घरून माेठमाेठी भांडे घेऊन येत. 'दूध घरी न्यायचं नाही' अशी ताकीद गुरूजी देत असतं. शाळेच्या गेटवर चिंचा, बाेरं विकणारी आजीबाई असायची. मारकुट्या मास्तरांच्या धाकानं कैक पाेरांचा वर्ग या आजीबाईच्या हातगाडीशेजारी भरायचा. शाळेबाहेरच्या या वर्गात माझाही नंबर असायचा.
नुकतच वाचायला शिकल्यानंतर मी गिरीश बुक डेपाेमधून अंकलीपीचं पुस्तक घेतलं हाेतं. किंमत हाेती 1 रुपया. पुस्तकाचं नाव 'महेश अंकलिपी'. आपले बाेल्ड फाॅन्टमधले छापील नाव पाहून वर्षभरात किमान दहा-बारा पुस्तकं तरी मी घेतली असावी. पुस्तकावरचं 'महेश' हे नाव कापून इतर पुस्तकं आणि वह्यांवर चिपकवलं हाेतं. त्या कारनाम्यासाठी एकदा मारही खाल्याचे आठवते. अायुष्यातल्या पहिल्या शाळेतल्या पहिल्या वर्गातल्या अशा कितीतरी आठवणी ताज्या झाल्या. पण काळाच्या आेघात सर्व बदलत गेलं. 23 वर्षात खाजगी इंग्रजी शाळांचं पीक आलं. स्पर्धा वाढली. चकाचक शाळांमधले वर्ग डिजीटल झाले. विद्यार्थी स्मार्ट झाले. या स्पर्धेत माझी शाळा पण बदलली.
- महेश घाेराळे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुणी घर देता का घर?