दहावीत जेव्हा मी काॅपी केली..


दहावीत जेव्हा मी काॅपी केली.. 
दहावीत भुमितीच्या पेपरला मी एक कॉपी नेली. सर म्हणत होते, "पोराईहो हा प्रश्न पाच मार्कांसाठी येणारच.'' परीक्षा केंद्र होतं खामगाव तालुक्‍यातील एक जिल्हा परिषदेची शाळा. 'निर्रा कॉप्यांचा महापूर.' परीक्षा सुरू झाली की, शाळेत येऊन पालक कॉप्या देत. धाड पथक आलचं तर, ऑफिसात चहा पाण्यात गुंग ठेवल्या जात असे. सर्वांचं अगदी शुद्धीत या प्रकाराकडे लक्ष असायचं. "पण गरीबाची पोरं बिचारी पास होतात तर, होऊद्या" असे "पुण्य घेण्याचे' काम शिक्षक करत. 

मोठ्या हिमतीनं मी कॉपी काढली.. अर्ध अधिक गणीत उतरवलं.
केंद्रप्रमुख का कुणीतरी ओरडत आलं, ""अरे बुलडाण्याहून पथक आलं. फेका फेका..''
एक चपराशी पोतं घेऊन वर्गात फिरू लागला. पोरं भराभर खिशातल्या कॉप्या पोत्यात रिचवू लागली. मी घाईघाईत जवळ असलेली एकमेव कॉपी खिशात कोंबली होती. ती पोत्यात टाकण्याच्या तयारीत तसा चपराशी ओरडला. ""तोंड काय पायतं.. टाक पटकन.'' क्षणाचाही विलंब न लावता जे खिशात असेल ते मी पोत्यात फेकलं. नंतर लक्षात आलं, हॉलतिकीट अन्‌ वीस रुपयांची नोटही फेकल्या गेली होती. आता काय करणार ? एकाग्रता दुभंगली नाही तर, "तिभंगली' होती. एक पेपरात, दुसरा हॉलतिकीटात, तिसरी वीसच्या नोटीत.

पेपर झाल्यावर वर्गा-वर्गातून कॉप्या गोळा होत असत. एका झाडाखाली पेटवून दिल्या जात असत. पेपर सुटला तसा या कामाला सुरूवात झाली होती. मी धापा टाकत त्या ढिगाजवळ गेलो. दोन चपराशांनी ढीग पेटवलाच होता.
"अहो, दादा आयकार्ड दिसलं का..?''
तो, "कोणाचं.. आयकार्ड..बीकार्ड नाई दिसलं..बरोबर ठेवता नाई येत.''
" ठेवलं होतं पण कॉपीसोबत फेकल्या गेलं ते..'' मी बोललो.
"पाहा बरोबर खिशातच अशीन लेका'', अस म्हणत त्यानं हुसकावूण लावलं.
रडकं तोंड घेऊन खालमानेनं मी तिथून निघालो. काही अंतरावर जाताच, त्या दोघांपैकी एकाने आवाज दिला.
"ओ महेश घोराळे.. इकडे ये..'' तसा धावतच गेलो नि आयकार्ड घेतलं.
"पैसे किती होते रे तुये'' त्यापैकी एकाने विचारलं.
"वीसची नोट'', मी म्हणालो.
"राहू दे मंग ते चहापान्याले..''


(काॅपीने घडवलेली हीच पहिली आणि शेवटची अद्दल..)

Comments

Popular posts from this blog

कुणी घर देता का घर?