भेंडवळची घटमांडणा आणि विदर्भातील कास्तकार
![]() |
घटमांडणीत समुद्राचे प्रतिक म्हणूनमातीचे मडके त्यावर सांडाेई, कुरडई व चारमहिन्यांचे प्रतिक म्हणून मडक्याला आधार असलेले मातीचे ढेकळं. |
अखोजीच्या(अक्षय तृतीयेच्या) मुहूर्तावर भेंडवळची (जि. बुलडाणा) घटमांडणी (भविष्यवाणी)पार पडली नि सोशल मीडियावर श्रद्धा-अंधश्रद्धेच्या चर्चेला ऊत आला. अनेकजण ही भविष्यवाणी म्हणजे शेतकऱ्यांची फसवेगीरी असल्याचे सांगतात. तर, तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीची भविष्यवाणी बहुतांश वर्षी तंतोतंत खरी ठरल्याचा दावाही अनेक शेतकरी करतात. नव्हे तर, विदर्भातील हजारो शेतकरी आजही भेंडवळच्या भविष्यवाणीचा आधार घेत पिकं ठरवतात, हेही तेवढचं खरं.
![]() |
घटमांडणीतील पिक पाऊस, राजकारण, सुरक्षेविषयी भविष्यवाणी एेकण्यासाठी जमलेले शेतकरी बांधव. |
अक्षय तृतियेनंतर गुरुवारी येणारा खामगावचा बाजार अन् सोमवार, मंगळवारी येणारा नांदूरा, शेगावचा आठवडी बाजार पाहा. जागोजागी शेतकऱ्यांमध्ये घटमांडणी आणि पिक पाण्याच्या गप्पा सुरू असतात. काही प्रकाशकांकडून या मांडणीतील भाकितांचे पुस्तकही बाजारात विकले जाते. दरवर्षी न चुकता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरही या भविष्यवाणीच्या बातम्या होतात. त्यामुळे यंदा अनेकांनी माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले आहे. पण ज्या बाबीला शास्त्रीय आधार नाही त्यावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न सुशिक्षितांकडून (अलिकडे) जास्त पुढे येत आहे.
भेडवळ भविष्यवाणीच्या आधारे दरवर्षी शेती करणाऱ्या विदर्भातील काही युवा शेतकऱ्यांच्या याबाबत प्रतिक्रिया घेतला. त्यातील एकाचं मत जशास तसं मांडण्या प्रयत्न ः
मीः ""हॅलो....! आईकली काय मांडणा...''
तोः ""हौ..भौ..कालच..!''
मीः ""काय खास हाय मंग यंदा..''
""चांगलं सांगलं यंदाचं साल.. मडकं थिर.. ढेकुय वले होते. (अतिवृष्टी नाही..साधारण पाऊस)
पानावर उलशिक माती आलती पण सुपारी जागच्या जागीच होती. (देशाच्या राजासमोरील तणाव वाढता तरी पद कायम)
मीः ""पटलं का मंग सरं...''
तोः "" मंजे न पट्याले काय झालं.. दरवर्षीच पटते..फेसबुकवर काईबी लिऊन रायले लोकं हल्ली''
मी ः ""अरे हो..! पण त्या भविष्यवाणीले काही आधार हाय का राजा..''
तो ः ""मग हवामान विभागाच्या अंदाजालेच कोणता आधार हाय.. तुम्ही बी पाऊनच रायले ना अंदाज.''
मीः "" भौ, हवामान विभाग आता शार्प झाला. जागोजागी हवामान केंद्र झाले. नवनवीन ऍप हायत मोबाईलवर. गारपीट, वादळ, अतिवृष्टीचे अंदाज त्यावर देल्ले जाते.''
तोः ""ते सर्व खर हाय पण हवामान विभागाच्या 100अंजादापैकी किती अंदाज यंदा खरे निघले ते पाहा. हवामान विभाग अस्तित्वात नवता तेवापासून लोकं भेंडवळची भविष्यवाणी आईकतात.''
मीः ""अरे हो पण ते एक भाकित हाय. ते तंतोतंत खरं कसं जुळेल.''
बहाद्दरांनं 2016 चा 2017 च्या घटमांडणीचं भाकीत सांगितलं.
मीः ""हा योगायोग हाय बे लेका...''
तोः ""भौ आमच्या पिढ्यानपिढ्यांत हाच योगायोग सुरू हाय.. आता तुमी आमाले-------नका शिकू. आम्ही हवामान विभागाचं म्हणनं आईकतो... तुमचं पेपरवाल्याईचंबी वाचतो..पण कोणाचं जास्त मनावर घेत नाई.''
- महेश घाेराळे
Comments
Post a Comment