त्या कोरोनावर लिव लय हाल केले उबार्‍यानं  !
"औ भाऊ तोंड पाह्यत नका बसू लवकर लवकर घ्या.. कांदे तीस रुपये किलो, पालक दहाची गड्डी, वांगे, गवार, कैरी पंधरा रुपये पाव.'' भाजीवाली मावशी तावातावानं गिर्‍हाईकापुढं रिकामे टोपले फेकत होती. मोजलेला भाजीपाला थैलीत भरून एकेकाला रवाना करत होती. जास्त भाव करायची किंवा भाजी निवडायची सोय नव्हती. 
"मावशी आज जरा लयचं घाई करून रायली बाप्पा'' हिंम्मत करून बोललोच. 
"घाई करू नाई तर काय. पोलिसाची गाडी आता उरावर ठ्या दिशी उबी रायते. भाजी पाल्याची गाडी रस्त्यावर उलंडून देली म्हंजे. लोकाईले काय हाय. त्याईले कोरोना काय अन फोरोना काय ? सारे दिवस सारखे. रस्त्यावर गाडी लावली तर पोलिसं हाकलतात....सांग पटकन काय दिऊ तुले..?''
तेवढ्यात एक आबाजी आले. एका हाती दुधाची पिशवी, काखेत बहुधा पासबुक वगैरेची प्लास्टिक पिशवी. 
"बाई..! काय म्हंतात वांगे''
"काहीच नाही म्हणत ते.. बोलत नाईत.'' मावशी जरा जास्तच कडाडली. 
"घ्या घोर.. अवं माय म्हंजे काय भाव हायत''
"पंध्रा रुपये पाव''
"अन आलू ?''
"इस !''
"शेवगा ?''
"शेवगाबी ईस तुमी पंध्रा द्या''
"पालक ताजा नाई का ?''
"आबा जास्तीच्या हिकायत्या नका करू घेनं अशीन तं मुकट्यानं घ्या. भाव नका इचारू दिवस मावस पायत जा जरासाक ?''
"निंब सांग कसे देल्ले ?''
"पाचचं एक दाहाचे तीनं''
"हे घे दाहाची नोटं अन् चार दे.''
काहीही एक न बोलता मावशीनं आबाच्या हाती चार लिंब टेकवले. उभ्या दोन गिर्‍हाईकाच्या पुढ्यात भाज्या भरण्यासाठी दोन रिकाम्या टोपल्या फेकल्या. 
चार पावलं पुढं जाऊन आबा पुन्हा परतले ""बाई हिरवे नाईत का निंबं ? हे जरा जास्तच पिवळे हायत ?''
"आबा..हिरवा तो निंबाचा पाला हाय.. वरपा अन् घिऊन जा घरी'' मावशी जरा जास्तच संतापल्या होत्या. त्यांच्या घामाघुम चेहर्‍यावर पोलिसाच्या कारवाईची धास्ती जाणवत होती. 
"येड्या **वण्याचे गिर्‍हाईकं. कालं हिरवे निंब आणले तं म्हणत पिवळे नाई का ? आज पिवळे आणले तं म्हंतात हिरवे नाई का ? आता निंबाईले रंगात डूबून आणाव का ?''
संतापलेल्या चेहर्‍यानं माह्याकडं पाहत त्या बोलल्या. "" तुले काय दिऊ रे भौ...असा एवढ्या दूर काहून उभा रायला.''
"ते आपलं हे.. सोशल डिस्टन्सिंग हाय ?''
"या लोकाईले सांग बाप्पा जरासक. साखर्‍याच्या दान्याले मुंग्या झोंबाव तसे झोंबले. एक एक मिरची निवडून घेतात. बापजन्मी मिरच्या पायल्या नाईत ना याईनं.''
"हं.. सांग तुले काय दिऊ.''
"लसण''
"निवडू नको घे पटापट'' पुढं टोपली फेकत मावशी बोलल्या. 
शेवटी पुन्हा एकदा हिंमत करून प्रश्न केलाच ""मावशी या गाडीवर एक काका असतात ना ?''
"हो पत्ता ख्या ले जायल हायत जातं का तू ? ''
"मावशी काई म्हणा तू निरा डसतंच बावा. एकाई गिराईकाशी धड बोलत नाई. एवढी जिवार येतं तं काहालं इकतं भाजीपाला.'' ही माझी परमोच्च हिंम्मत होती.
"तुले लसण घेणं अशीन तं घे अन निंघ मुकट्यानं, रिकाम्या पंचायती नको करू.'' 
"मावशी मी पत्रकार हाय.. एक बातमी बनोयाची होती तुयावरं..'' अंतर कमी करत आता थेटचं मुद्द्याच्या विषयाला हात घातला. त्यावर उत्तर काय असेल याची कल्पनाही होतीच. 
"नाई रे बाप्पा माई नको करू बातमी. पयलेच तं पोलिसं सुचू देत नाईत. माणूस गाडीवर दिसला की त्याले दंडे मारतात. म्हणून सन्या मायासारख्या बाईच्या जातीले कोपच्या कापच्यात भाजीची गाडी लावा लागते. बाईची जात पायली की पोलिस निदान कल्ला तरी करतात. आता सर्‍या जगातच कोरोना हाय. आपल्या सारख्या हातावर पोट घिऊन जगणार्‍यानं काय पाप केलं. शंबर दोनशे हाताशी आले तरचं घर भागते भौ. नाईतं उपाशी मर्‍याची पाळी होय. त्यात तू बातमी टाकशीन तं उपाशी मारतं काय बावा.''
मला बातमी भेटली होती. त्यात एका महिलेची भूकेसाठीची तळमळ होती. लोकांच्या बेफिकीरीचा संताप होता. कोरोनाचा धसका होता. नवर्‍याविषयीची चिड होती. घराविषयीची काळजी होती. समाजाविषयीचा राग होता आणि व्यवस्थेला सहकार्यही होतं. पण बातमीला जागेवर ठेऊन नुसती लसणाची पिशवी घेऊन मी चालता झालो. 
तेवढ्यात मावशी बोलली. 
"त्या कोरोनावर लिव बातमी.. लय हाल हाल केले उबार्‍यानं''

- महेश घोराळे, अकोला  

Comments

Popular posts from this blog

कुणी घर देता का घर?