बाबासाहेबांना पाहण्यासाठी अकोला स्टेशनवर दहा मिनीटे थांबवली होती रेल्वे
बाबासाहेबांना पाहण्यासाठी अकोला स्टेशनवर दहा मिनीटे थांबवली होती रेल्वे
अकोल्यातील शाहीर वसंत मानवटकर सांगतात,
तो काळ १९४७ च्या दरम्यानचा असावा. मी खूप लहान होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर अनुयायांची प्रचंड गर्दी जमली होती. बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी अनुयायी, कार्यकर्त्यांनी हातची कामं सोडून स्थानक गाठलं होतं. लोक मुंबईहून येणाऱ्या रेल्वेकडे डोळे लाऊन बसले होते. अखेर रेल्वे आली. बाबासाहेब स्थानकावर उतरले नि त्यांच्या भोवती एकच गर्दी झाली होती. यावेळी दहा मिनीटे रेल्वे स्थानकावर थांबली होती. डोक्यावर हॅट, अंगावर पूर्ण खाकी गणवेष, कमरेला भलामोठा पट्टा आणि भारदस्त शरीरयष्टी असे बाबासाहेबांचे ते रुबाबदार रुप अजूनही डोळ्यासमोर येते. या आठवणी जागवल्या आहेत शहरातील ज्येष्ठ शाहीर वसंत प्रल्हाद मानवटकर यांनी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ शाहीर वसंत मानवटकर यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत डॉ. आंबेडकर यांना अकोला रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष पाहिल्याचा प्रसंग सांगितला. ते सांगतात, एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वेने मुंबईहून नागपूरला एका बैठकीनिमित्त जात होते. प्रवासादरम्यान ते अकोला स्थानकावरून जाणार असल्याची माहिती अकोट फैल, भीमनगर व तारफैलातील काही कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहायचे त्यांनी स्थानकावर यावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले होते. तेव्हा कार्यकर्ते अनुयायींनी हातची काम सोडून रेल्वे स्थानक गाठले होते. स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. लोक बराचवेळ आधी येऊन बसले होते. बाबासाहेबांना पाहण्यासाठी आलेला वर्ग हा मजूर, कामगारांचा होता. यातील बहुतांश लोक हे शहरातील सावतराम आणि मोहता मिलमध्ये काम करत होते. ते हातचे काम सोडून स्थानकावर जमले होते. अखेर प्रतिक्षा संपली अन् मुंबईहून नागपूरकडे जाणारी रेल्वे अकोला स्थानकावर दाखल झाली. बाबासाहेब खाली उतरले तशी अनुयायींनी त्यांच्या भोवती गर्दी केली. एवढ्या मोठ्या गर्दीत मला बाबासाहेब दिसत नव्हते. त्यांना पाहण्यासाठी जवळही जाता येत नव्हते, म्हणून वडिलांनी (प्रल्हाद मंगल मानवटकर) मला खांद्यावर घेतले व बाबासाहेबांचे रुबाबदार रुप पाहता आले. बाबासाहेब अकोला रेल्वे स्थानकावर उतरलेले असल्याने तब्बल दहा मिनीटे रेल्वे थांबवावी लागली होती.
--
कार्यालयातून खूर्ची आणली
शाहीर मानवटकर सांगतात, डॉ. आंबेडकर अकोला रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांना बसण्यासाठी स्टेशन मास्टरच्या कार्यालयातून खूर्ची आणण्यात आली. त्यावर बाबासाहेब बसले होते नि जमलेल्या अनुयायींसोबत संवाद साधत होते.
-
Comments
Post a Comment