काशिरामभाऊ... 
वावरातल्‍या कामानं त्‍याची हाडं मोकय होत व्‍हती.. कधीही पाहा तो घामानं डबडबलेलाच.. वय लगबग 
पंच्‍याहत्‍तरीचं पण उत्‍साह तरण्‍याबांड पोरासारखा.. मीठ भाकरीसाठी धडपडणा-या आयुष्‍यातही तो कमालीचा 
विनोद शोधायचा.. तो कुठंही असो.. आसपासची लोकं पोट दुखेस्‍तोवर हसायची.. काशिरामभाऊ तेव्‍हा होताच 
तसा, आता वय वाढलं, तरी गुण मात्र कायम आहे.. वयानं वटवृक्षासारख्‍या या मानसाच्‍या सावलीत मी पण 
खेळलो आहे. त्‍यांची संगत लाभलेल्‍यांना त्‍यांचे बरेच प्रसंग घट्ट आठवणीत राहण्‍यासारखे आहेत. त्‍यापैकी एक.. 

त्‍या गुरूवारी फाट्यावर भलतीच गर्दी होती. खामगांव बसची वाट पाहतं कॉलेजचे विसेक पोरं पोरी उभी होती. 
त्‍यात एक मी पण होतो. गुरूवार बाजाराचा दिवस. काशिरामभाऊ झकपक पांढरे कपडे घालून पोराईच्‍या 
घोळक्‍यात बसले होते. हा माणूसच असा की, साखरेच्‍या दाण्‍याभोवती मुंग्‍या जमाव्‍या. पोंरांमध्‍ये ते मिसळून 
जात, तेव्‍हा गप्‍पांच्‍या विषयांना मर्यादा नसायची. कानोसा घेत मी ही या घोळक्‍यात सामील झालो. दूरून आणखी पाचेक लोकं याच दिशेनं येत होती. संपू, इशोर अन् आणखी तिघं होती. संपू आपल्‍याकडं येत असल्‍याचं पाहून काशिरामभाऊ पोराईच्‍या घोळक्‍यातून उभे झाले.

"लेका संपू भलताच उशीर लावला लेका त्‍वा, चार गाड्या हुकोल्‍या म्‍या तुयासाठी"  काशीरामभाऊनं भलीमोठी थाप मारली. अर्थातच ती संपूला पटणारीही नव्‍हती.
संपू - "काऊन फेकून रायले राजा, घंटाभर झाले एसटी नाई, पोराईत बसेल हा बॉ तुमी."
काशिरामभाऊ - "हुत लेका तुवा भरोसा काऊन नसते बे आमच्‍यावर!!!"
संपू- " बरं बॉ बरं झालं मंग थांबले तं... आता काय करू मी.." इकडच्‍या तिकडच्‍या गप्‍पा मारून झाल्‍यावर काशिरामभाऊंनी मुळ विषयाला हात घातला.. तो त्‍यांचा नेहमीचाच  आणि लोकप्रिय..

"सकाळी उठलो संत्राईचे 13 ट्रक उभे होते वावराईत. गड्याले म्‍हटलं लेका नेनं हे इक्‍याले, संतरं सोकून रायले राजा.. गडी काहाचा गोट घेते.. देल्‍ले बॉ वाटून सन्‍या गावामंदी.." काशिरामभाऊ नॉनस्‍टॉप सुरू झाले. '' मंग उठलो वाडग्‍यात गेलो. आज बेचाळीस म्‍हशीचचं दुध घेतलं काढून.. बाकी म्‍हशी पायल्‍याच नाईत गड्यानं.. भलती पंचाईत हाय.. आमचे चार गडी नागपूरात जायल हायत खवा इक्‍याले.. ते बी जात नवते त्‍याईले म्‍हणलं.. गडेहो.. चारेक किंटल खवा जमा झाला तो इकून या.. तेवढेच पैसे कामा येतात.. काय करू भलते अयदी गडी भेटले राजा मले..."  

मुळात काशिरामभाऊजवळ ना संत्राचा मळा होता, ना वाळग्‍यात म्‍हशी. ना खवा, ना ट्रक..तेच दुस-याच्‍या वावरात काम करतं अन् घोटभर दुधासाठी गावभर फिरत. सांगायले त्‍यांच्‍याकडे टिच्‍चूभरबी जमीन नवती. पण अनोळखी माणसांमध्‍ये त्‍यांचा हा फंडा ठरलेलाच असायचा. 'लंब्‍या लंब्‍या गोटी फेक्‍याच्‍या.. पुड्या सोड्याच्‍या.. मगं लोकं भिरभीर पायतात, एसटीत, बजारात चर्चा होते.. ''कोण हाय बॉ माणूस भलताच रईस दिसून रायला.. बापरे! बाप बुड्याजोय टरकाईनं संतरे हायत.. बाप्‍प्‍प्‍प्‍पा! बेचाळीस म्‍हशी. कोण्‍या गावचा हाय रे बॉ हा माणूस" अशा गप्‍पांमध्‍ये काशिरामभाऊ रमत. गावातले लोकही त्‍यांना चांगलीच साथ देत असते. 

बाजारातला कट्टा, चहाची टपरी किंवा बसमध्‍ये. गर्दी असली की, काशिरामभाऊच्‍या संग राहणारे लोक मोठमोठ्यानं बोलत अन् इतरांचं लक्ष वेधून घेतं. आताही बसमध्‍ये तसच झालं होतं, संपूनंच कुरापत उकरून काढली अन् काशिरामभाऊंना विचारलं..

"आबा एसटीची वाट पायल्‍यापेक्षा तुमच्‍या मारोती कारनं काहून गेले नाई खामगांवले.. नाईतरी तीन तीन गाड्या हायत बॉ तुमच्‍याजोळ ?" 
       
एकदमचं एसटीतल्‍या आठ दहा लोकांची नजर काशिरामभाऊकडे फिरली, अन् काशिरामभाऊला चांगलच दाटून आलं. "अरे बावा मारोती काढली व्‍हती ना म्‍या भाईर.. काल कोण्‍या पोरानं गोटा मारला काचाले.. काय करतं. बिनाकाचाची गाडी चालोतं काय.. दुसरी कार माया पोरानं नेली.. पुण्‍याले.. एक पंचर पडेल हाय किती दिवसाची.." काशिरामभाऊच्‍या या उत्‍तरानं दोनेक जण गारचं पडले. 

एकानं  न राहून इशोरला विचारलं, "या बॉ जोळ तीन कार हाय काय लागे." आता काशिरामभाऊचा चेला इशोर काय उत्‍तर देईन कल्‍पना न केलेली बरी.

"बापा! तीन कार तं त्‍याईनं मजाक मजाक मंदी घेल हायत, सात टरकं, कोकलॅड.. कापसाचं सत्‍तर एक्‍कर वावर, तेईतीस एक्‍कर लागे मया.. पाच गावातई त्‍याईचा हात नाई पकडत बावा कोणी.. टॅक्‍टरई लय हायत त्‍याईच्‍या जोय." आणखी चार दोन लोकांच्‍या नजरा काशिरामभाऊकडं फिरल्‍या. तशी इसोरनं संधी साधली. विनाकारण संकोचल्‍यासारखं करत विचारलं.

"भाऊ टॅकटरं किती हायत हो तुमच्‍याजोळ.. काही इकलेनं वाट्टे गेल्‍या साली"
काशिरामभाऊनं भुवया ताणल्‍या, ''आता काऊन तू माया जखमवर मीठ रगडतं राजा इशोर.. हुत लेका.. ''
इशोर - "काय झालं?"
काशिरामभाऊ- "मागच्‍या वर्षी चार टॅकटरं गेलेना बावा पूरात वाहून सन्‍या.. गड्याईच्‍या भरोश्‍यावर कारभार काई धडा नाही"
तेवढ्यात संपू बोलला, "चार पूरात गेले, पण बाकीचे असतीन ना? तेरा टॅकटरं होते ना तुमच्‍याजोळ"
लोकांच्‍या आपल्‍याकडे असलेल्‍या नजरा पाहून काशिरामभाऊ विनाकारण वैतागल्‍यासारखं बोलले, "हो रे बॉ.. तेरा होते.. खरी हाय तुई गोट.. गेल्‍यासाली एक टॅकटर शारदीच्‍या मामाले देलं.. तीन वाहून गेले.. दोन टॅकटरं किती वर्षाचे भंगारात पडेल हायत.. काही आमचा गडी लक्ष देत नाही.. ना पोरगा" असं म्‍हणून काशिरामभाऊनं डोक्‍यावरची टोपी काढली, अन् घाम पुसला. (बाकी.. थांबून)  

                           - महेश घोराळे 

Comments

Popular posts from this blog

कुणी घर देता का घर?